Top News

राजा प्रधान यांच्या एकपात्री लोकनाट्य 'हालगी ' प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ज्येष्ठ कलाकार राजा प्रधान यांचा एकपात्री लोकनाट्य ‘हालगी’ या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ रंगतदार वातावरणात पार पडला. उत्कृष्ट अभिनय, संगीत-गायनाची साथ आणि धमाल विनोदामुळे उपस्थित कलारसिकांना सांस्कृतिक मेजवानी लाभली. हलक्या-फुलक्या विनोदी शैलीत समाजातील घडामोडींचा वेध घेणाऱ्या या प्रयोगाने प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

कलाविश्व रंगभूमी व आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित या प्रयोगाचा शुभारंभ निवृत्त शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी आणि वेध फाउंडेशनच्या प्रमुख रजनीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कलाविश्व रंगभूमी संस्थेचे डॉ. दगडू माने यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.

राजा प्रधान यांनी सादर केलेले ‘हालगी’ हे एकपात्री लोकनाट्य टिपिकल, पॉलिटिकल आणि ग्रामीण विनोदी शैलीत रंगले. राजकारणातील घडामोडी, सामाजिक वास्तव आणि ग्रामीण बोलीभाषेतील गंमतीशीर प्रसंग यांची प्रभावी मांडणी या प्रयोगातून करण्यात आली. लोकजागृतीचा संदेश देतानाच परिवर्तनाची जाणीव करून देणारा हा वेगळ्या धाटणीचा प्रयोग रसिकांना भावला.

यावेळी कलाकार राजेंद्र प्रधान तसेच कार्यक्रमास योगदान देणाऱ्या उदगाव टेक्निकल हायस्कूलचे कलाशिक्षक जे. के. कांबळे आणि त्यांच्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास रुबाब चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन ठाणेकर, सिनेअभिनेते सर्जेराव गायकवाड, महादेव शिरोळकर, शिरोळ दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, प्रहार चित्रपट संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप मोहिते-पाटील, हरिश यमगर, बाबासाहेब नदाफ, लाला माचरेकर, खंडेराव हेरवाडे, विजया दाभाडे, स्नेहल शिंदे, अभिजीत माने, बाळासाहेब कांबळे, रावसाहेब भोसले, सचिन कमलाकर, राजेंद्र दाभाडे, दिलीप उर्फ दिवान कोळी, अनिल लोंढे, अनिल पाटील, डी. आर. पाटील, संदीप माने, प्रा. विजय शिरोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते कैस शेख (मिरज), आदर्श उपाध्ये (लातूर), रमेशकुमार मिठारे (अकिवाट), नगराध्यक्ष दिगंबर कांबळे (बोरगाव), राहुलदेव पोवार (यड्राव) आणि सुरेखा शेख (सांगली) यांना आदर्श समाज सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शिवाजी एडवान (माणकापूर) यांना आदर्श पत्रकाररत्न, रोहित शिंदे (मिरज) यांना लोकजागृती कलारत्न आणि सुगंधा माने (शिरोळ) यांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने