Top News

गडहिंग्लज-चंदगड भागात अवैध मद्यावर धडक कारवाई; तीन वाहने व मद्यसाठा जप्त

 


चंदगड / शिवार न्यूज नेटवर्क :

चंदगड गडहिंग्लज तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क पथकाने अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत मोठा मद्यसाठा जप्त केला आहे.या कारवाईत गोवा बनावटी मद्य, हातभट्टी दारू तसेच तीन वाहनांसह एकूण ७ लाख ३३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे तसेच कोल्हापूर विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली.राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज पथकाने भडगाव व वडरगे (ता. गडहिंग्लज), अर्जुनी (ता. कागल) तसेच हिंडगाव (ता. चंदगड) या भागांत नोंदविण्यात आलेल्या पाच स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये ही कारवाई केली. यावेळी गोवा बनावटी मद्याची वाहतूक करणारी एक चारचाकी कार आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच अवैध हातभट्टी दारूची वाहतूक करणारी आणखी एक दुचाकीही ताब्यात घेण्यात आली.

या प्रकरणी सागर चंद्रकांत भुसूरी, अमृत चंद्रकांत भोसले, प्रकाश लक्ष्मण नाईक, सर्जेराव विलास जिरगे आणि शंकर विठू पाटील यांच्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये गोवा बनावटी मद्य साठा ३ लाख ६१ हजार १० रुपये, हातभट्टी दारू साठा ७ हजार ५० रुपये तसेच वाहतुकीसाठी वापरलेली वाहने ३ लाख ६५ हजार रुपये किंमतीची असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.या कारवाईत निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, स्वप्नील पाटील, रोहित केरीपाळे, सहायक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, संदीप चौगुले, भरत सावंत, महिला जवान स्वप्नाली बेडगे तसेच वाहनचालक अविनाश परीट यांनी सहभाग घेतला.अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई पुढील काळातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने