अमर माने / शिवार न्यूज नेटवर्क :
मलिकवाड (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे होणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा द्वादशा महोत्सव २०२६ व भक्ताम्बर आराधना महामंडळ या भव्य धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रिका उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
मलिकवाड येथे आयोजित करण्यात आलेला हा ऐतिहासिक धार्मिक सोहळा दि. २३ एप्रिल २०२६ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या पत्रिकेचे उद्घाटन सौ.धनश्री उत्तम पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
विशेष म्हणजे पंचकल्याण प्रतिष्ठा द्वादशा महोत्सव व भक्ताम्बर आराधना महामंडळ हा धार्मिक सोहळा कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात प्रथमच मलिकवाड येथे आयोजित करण्यात येत आहे.
मलिकवाड ही पुण्यनगरी म्हणून ओळखली जात असून येथे विसावे तीर्थंकर मुनीसुव्रतनाथ भगवान यांची अतिशय प्रभावी व मनोहर मूर्ती विराजमान आहे. या पवित्र स्थळी दर्शन घेतल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे दूरदूरहून हजारो श्रावक-श्राविका दर्शनासाठी येत असतात. विशेषतः प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते.
या महोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, पूजन, भक्ताम्बर महामंडल आराधना, आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुलांच्या बुद्धिमत्ता विकासासाठी इंटरनॅशनल कोच वैष्णवी नवीन (बेंगलोर) यांचे विशेष मार्गदर्शन होणार असून निर्वाण दीपक मगदूम (ठाणे, मुंबई) यांचे प्रेरणादायी मार्गदर्शनही भाविकांना लाभणार आहे.
हा भव्य धार्मिक सोहळा परमपूज्य आचार्य जिनसेन मुनी महाराज व संघस्थ यांच्या पावन सान्निध्यात पार पडणार आहे. तसेच नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली व कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत हा महोत्सव संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रतिष्ठाचार्य दर्शन उपाध्ये, अजित उपाध्ये, मंदिर कमिटी अध्यक्ष राजेंद्र पाटील, रावसाहेब कुन्नुरे, जयपाल बाळीकाई, रामण्णा भेंडीकटगे, बाळासो भेंडीकटगे, संजय कुन्नुरे, विजय चिंचवड, महावीर देसाई, बाळू देसाई, विनोद हरोळे, बाबासो कुन्नुरे, बाबासो भेंडीकटगे, सुनील भेंडीकटगे, श्रेणिक भेंडीकटगे, बंडू भेंडीकटगे तसेच सर्व सवालधारक, इंद्र परिवार, श्रावक-श्राविका, वीर सेवा दल व वीर महिला मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
