Top News

गुढीपाडव्याला १७१४ नवागत विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेत नोंदणी

इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील ३०७२ दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी तब्बल १७१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. 

गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा सण मानला जात असल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात याच दिवशी करण्यास प्राधान्य दिले. विशेषतः लहान मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले. “शिक्षण हाच खरा दागिना” या विचाराला पालकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे या नोंदणीवरून स्पष्ट झाले.

जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. डिजिटल शिक्षण, आनंददायी अध्यापन पद्धती, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या योजनांमुळे या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे. शिक्षकवर्गही विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे.

यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांनी, गोडधोड देऊन आणि आकर्षक सजावटीत करण्यात आले. काही शाळांमध्ये छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शाळेत सामावून घेण्यात आले. पालकांनीही शाळांच्या सुविधा, उपक्रम आणि शिक्षणाच्या दर्जाचे कौतुक केले.

तालुक्यात दिवसभरात एकूण १७१४ नवीन प्रवेश नोंदविण्यात आल्याची माहिती शिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी दिली. या वाढत्या प्रतिसादामुळे जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुढीपाडव्याच्या या शुभदिनी झालेल्या नावनोंदणीमुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात झाली आहे.

थोडे नवीन जरा जुने