हातकणंगले / शिवार न्यूज नेटवर्क :
टोप (ता. हातकणंगले) येथील भोसले खडी मळा परिसरात सर्पदंशामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सुनीता सर्जेराव भोसले (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता भोसले या नेहमीप्रमाणे सकाळी शेतीकामासाठी घराबाहेर पडल्या होत्या. बिरदेव मंदिरामागील भोसले खडी मळ्यातील आपल्या शेतात त्या काम करत होत्या. शेतात साठवून ठेवलेला कडबा उचलत असताना, त्याखाली दबा धरून बसलेल्या घोणस जातीच्या सापाने अचानक त्यांच्या पायाला चावा घेतला.सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच सुनीता यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने जवळच काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत सापाला ठार मारले आणि सुनीता यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र, घोणस सापाचे विष अतिशय तीव्र असल्याने ते त्यांच्या शरीरात वेगाने पसरले. डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे. शेतात काम करताना सर्पदंशाचा धोका वाढत असल्याने शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या भागात सर्पनियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
