कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रा पार्श्वभूमीवर प्रशासनाने व्यापक तयारीला सुरुवात केली असून भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये,यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन अमोल येडगे यांनी केले.बुधवार, १८ मार्च रोजी श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
ही बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच योगेशकुमार आणि कार्तिकेयन एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे व तहसीलदार माधवी शिंदे यांनी मागील वर्षीच्या यात्रेतील अनुभव आणि कार्यवाहीची माहिती सादर केली.महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून लाखो भाविक या यात्रेसाठी येत असल्याने यंदा अधिक प्रभावी व वेळेवर नियोजन करण्यावर भर देण्यात आला. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी डोंगरावरील विविध ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लास्टिक वापरावर कडक निर्बंध घालण्याचे निर्देश देण्यात आले असून स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला.भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व शौचालयांची पुरेशी व्यवस्था करण्यावर विशेष भर देण्यात आला. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांगांचे योग्य नियोजन, तसेच त्या ठिकाणी सावली व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन, आरोग्य सुविधांसाठी जिल्हा आरोग्य विभाग व सीपीआर रुग्णालय, तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी राज्य परिवहन महामंडळ आणि केएमटी विभाग यांना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. याशिवाय वीजपुरवठा, आरटीओ, आपत्ती व्यवस्थापन व सार्वजनिक बांधकाम विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, ग्रामस्थांनी जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यास मंजुरी मिळाल्याबद्दल शासनाचे आभार मानले. यात्रेदरम्यान शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण राखण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
