Top News

बोरगाव फिरगन्नवर मळा येथील श्री अरण्यसिद्धेश्वर व जैन मंदिरासाठी ३६ लाखांचा निधी मंजूर – नगरसेवक शरद जंगटे


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री तथा निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव येथील फिरगन्नवर मळा परिसरातील कुलदैवत श्री अरण्यसिद्धेश्वर मंदिर व जैन मंदिराच्या बांधकामासाठी एकूण ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक व बोरगावचे नगरसेवक शरद जंगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फिरगन्नवर मळा येथे श्री अरण्यसिद्धेश्वर देवाचे प्राचीन व जागृत मंदिर असून परिसरात जैन मंदिरही आहे. या दोन्ही मंदिरांचा जिर्णोद्धार व सुशोभीकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्यानुसार अरण्यसिद्धेश्वर मंदिरासाठी १५ लाख रुपये, तर जैन मंदिरासाठी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

यात्राकाळात भक्तांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कूपनलिका (बोअरवेल) मंजूर करण्यात आल्याचीही माहिती जंगटे यांनी दिली.

यावेळी बोलताना जंगटे म्हणाले की, अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांनी बोरगावच्या विकासाचा ध्यास घेतला असून त्यांच्या प्रयत्नांतून शहरासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध होत आहे.

पत्रकार बैठकीस जितू पाटील, बी. के. महाजन, अजित तेरदाळे, सचिन कोळी, बबन रेंदाळे, शंकर गुरव, भरत कांबळे, किसन गोसावी, अमोल पाटील, सागर आलासे, राजू लटलटे, महावीर पाटील, भरत पाटील, संजू महाजन, फिरोज अफराज, भूपाल महाजन, राजू कुंभार आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने