हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील कन्या विद्या मंदिर शाळेने अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरावर घातलेली बंदी हा अत्यंत स्तुत्य, धाडसी आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि विविध अॅप्स ही शिक्षणासाठी उपयुक्त साधने ठरू शकतात; मात्र त्याचा अतिरेक विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर, अभ्यासातील सातत्यावर आणि स्वतंत्र विचारक्षमतेवर विपरीत परिणाम करत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. अशा पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन समितीने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असे मत अब्दुललाट जिल्हा परिषद सदस्या श्रद्धाताई गायकवाड यांनी व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आदर्श आणि मार्गदर्शक असतात. शिक्षकांनीच वर्गात मोबाईलचा अनावश्यक वापर टाळला तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे भान आणि अभ्यासाविषयी गांभीर्य निर्माण होईल. वर्गात मोबाईलमुळे निर्माण होणारे व्यत्यय कमी झाल्यास अध्यापन अधिक प्रभावी होईल आणि विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढीस लागेल. आज अनेक मुले लहानसहान प्रश्नांसाठी त्वरित गुगलचा आधार घेतात; त्यामुळे त्यांची विचार करण्याची आणि शोध घेण्याची सवय कमी होत आहे. अशा स्थितीत पुस्तक वाचन, शिक्षकांशी थेट संवाद आणि समूहचर्चा यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
डिजिटल साधनांचा वापर पूर्णपणे नाकारण्याचा या निर्णयामागील हेतू नसून, त्याचा वापर केवळ शैक्षणिक गरजांसाठी आणि मर्यादित प्रमाणात व्हावा, हीच अपेक्षा आहे. तंत्रज्ञानाचा समतोल आणि जबाबदारीने वापर केल्यासच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिंतनशीलता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी शाळांनी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
पालकांनीही या निर्णयाचे स्वागत करून शाळेला सहकार्य करावे. घरामध्ये मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवून त्यांना वाचन, खेळ, सांस्कृतिक उपक्रम आणि कुटुंबीयांशी संवाद याकडे वळवणे आवश्यक आहे. शाळा आणि पालक यांचे संयुक्त प्रयत्नच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक ठरतील.
हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, जिल्हा परिषद स्तरावर याबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे हित, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुसंस्कारित पिढी घडवणे हेच आपले अंतिम ध्येय असल्याचेही श्रद्धाताईंनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा