अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षा अखेर बुधवारी (ता. १८ मार्च) संपल्या असून, तब्बल सव्वीस दिवस चाललेल्या या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. २० फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या परीक्षांमुळे तणावाखाली असलेले विद्यार्थी आता मोकळे झाले आहेत.
यंदाच्या परीक्षेत सर्व विषयांना पुरेसा कालावधी मिळाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली संधी मिळाली. वर्षभराच्या मेहनतीनंतर सर्व पेपर पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. शेवटचा पेपर संपताच परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांनी एकमेकांना भेटत आनंद साजरा केला.
दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांसाठी हा क्षण भावनिक ठरला. पहिली ते दहावीपर्यंत एकत्र शिकलेले, एकाच बाकावर बसलेले, डबा शेअर केलेले मित्र आता वेगवेगळ्या वाटा पकडणार असल्याने गळाभेट घेत निरोप घेताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दिसून आले. “पुन्हा भेटू” असे म्हणत जड अंत:करणाने सर्वांनी आपापल्या घराचा रस्ता धरला.
दहावी ही शालेय जीवनाची अखेरची पायरी मानली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महाविद्यालयीन जीवनाची नवी सुरुवात होते. त्यामुळे पुढे कोणता अभ्यासक्रम निवडायचा, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चर्चा रंगताना दिसत होती. काही जण सुट्टीत फिरायला जाण्याचे नियोजन करत होते.
दरम्यान, बारावीच्या परीक्षा देखील १० फेब्रुवारी ते १३ मार्चदरम्यान पार पडल्या आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांसह पालकही चिंतामुक्त झाले आहेत. निकाल लागेपर्यंतचा कालावधी उपयोगी घालवण्यासाठी अनेक पालक आपल्या मुलांना संगणक, टायपिंग तसेच इतर कौशल्याधारित अभ्यासक्रमांकडे वळवण्याचा विचार करताना दिसत आहेत.
