Top News

सांगलीतील भावे नाट्यगृहात ‘हालगी’ एकपात्री लोकनाट्याचा शुभारंभ

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ येथील प्रसिद्ध एकपात्री नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान यांच्या ‘हालगी’ या एकपात्री लोकनाट्य प्रयोगाचा शुभारंभ रविवारी (१५ मार्च) दुपारी ३ वाजता Vishnudas Bhave Natyagruha येथे होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून कला रसिकांनी प्रयोगाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजक प्रमुख राजेंद्र दाभाडे व डॉ. दगडू माने यांनी केले आहे.

कलाविश्व रंगभूमी व आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या शुभारंभ सोहळ्यास सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एकपात्री नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान यांनी यापूर्वी ‘नमस्कार मी कैलासवासी’ व ‘खैंदूळ’ हे प्रयोग सादर करून रसिकांची दाद मिळवली आहे. विशेष म्हणजे ‘खैंदूळ’ या एकपात्री प्रयोगाचे सलग ३६ तासांत १२ प्रयोग सादर करून त्यांनी विश्वविक्रमही नोंदविला आहे.

‘हालगी’ या एकपात्री लोकनाट्यात राजकारणातील घडामोडी, सामाजिक वास्तव आणि ग्रामीण बोली भाषेतील गंमती यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. टिपिकल, पॉलिटिकल आणि धमाल विनोदी शैलीतून सादर होणारा हा प्रयोग हलक्या-फुलक्या विनोदातून समाजातील विसंगती, राजकीय परिस्थिती तसेच सामान्य माणसाच्या मनातील भावना व्यक्त करणारा आहे.

दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी कलाविश्व रंगभूमी व आधार संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये कैस शेख (मिरज), सुरेखा कांबळे (सांगली), आदर्श उपाध्ये (लातूर), शिवाजी एडवान (माणकापूर), रमेशकुमार मिठारे (अकिवाट), नगराध्यक्ष दिगंबर कांबळे (बोरगाव) आणि राहुलदेव पोवार (यड्राव) यांना ‘आदर्श समाज सेवारत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच रोहित शिंदे (मिरज) यांना ‘लोकजागृती कलारत्न’ तर सुगंधा माने (शिरोळ) यांना ‘आदर्श माता’ पुरस्कार देण्यात येणार आहे.

संयोजक राजेंद्र दाभाडे म्हणाले, “शिरोळसारख्या ग्रामीण भागातून अनेक गुणी कलाकार घडले आहेत. राजेंद्र प्रधान यांच्यासारखे कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशा कलाकारांना प्रोत्साहन देणे ही सर्वांची जबाबदारी आहे.”

कला रसिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजेंद्र प्रधान यांच्या ‘हालगी’ या एकपात्री लोकनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने