Top News

बुबनाळे येथे शरद कृषीच्या एन.एस.एस. शिबिराचे उदघाटन

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 राष्ट्रीय सेवा योजने (एन.एस.एस.) अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबरोबरच समाजातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सक्रिय प्रयत्न करावेत, असे आवाहन शऱद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते बुबनाळ येथे शरद कृषी महाविद्यालय व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने एन.एस.एस. विशेष श्रम संस्कार शिबिर उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच सौ.शिवलीला ऐनापुरे प्रमुख उपस्थीत होत्या. 

यावेळी बोलताना बागणे म्हणाले, “सध्या अनेक भागांत महापूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असून शेतकरी व नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, सांडपाण्याचे नियोजन, ऊर्जाबचत आणि व्यसनमुक्ती या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रबोधन व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. एन.एस.एस. शिबिर हे केवळ श्रमदानापुरते मर्यादित नसून समाजजागृतीचे प्रभावी व्यासपीठ आहे.”

सरपंच सौ. ऐनापूरे शिबिराच्या उपक्रमांचे कौतुक करत ग्रामविकासासाठी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमात सुकुमार किणींगे यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र वैरागे, दिनकर मांजरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.एस.आर.कोळी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिबिरातून सामाजिक जाणीवा दृढ करण्याचा संदेश दिला.

शिबिरादरम्यान गावस्वच्छता, वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान आणि ऊर्जाबचत या विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकारी अधिकारी प्रा. दादासाहेब मगदूम यांनी शिबिराचे नियोजन केले. या वेळी एस एस सलगरे, श्री.बी.ए.पलके यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. वैष्णवी पवार यांनी मानले.


थोडे नवीन जरा जुने