Top News

शाहू आघाडीला साथ द्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेवू : खासदार धैर्यशील माने

 दत्तवाड येथे शाहू विकास आघाडीची जाहीर सभा संपन्न 


इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

 केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच दिशेने काम झाले तरच विकासाचा रथ वेगाने पुढे जाईल, खासदार, आमदार म्हणून केंद्राचा निधी राज्यामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रभावी प्रतिनिधींमुळेच पार पडते, असे त्यांनी स्पष्ट केले. शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सर्वसामान्य, बहुजन व गरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. पाणीपुरवठा, क्रीडांगण, घरकुल, शिक्षण, सामाजिक योजना व मूलभूत सुविधांसाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार आणि आमदार आपल्या बाजूला असतील तर जिल्हा परिषद व पंचायत समितीही आपलीच असली पाहिजे, असे ठाम मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. 

दत्तवाड येथील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार उत्तरा शिंदे, पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब वनकोरे व अविनाश पाटील यांच्या प्रचारार्थ दत्तवाड येथे आयोजित जंगी जाहीर सभेत धैर्यशील माने बोलत होते.

स्वागत माजी सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी केले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या मनोगतात तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचा आर्थिक स्तर उंचावणे हेच अंतिम ध्येय असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न कसे वाढेल, रोजगार कसा निर्माण होईल, यावर पुढील काळात लक्ष केंद्रित केले जाईल, असे त्यांनी सांगितले. जाती-पाती, गट-तट, पक्षभेद बाजूला ठेवून केवळ विकास हा एकच अजेंडा घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडी काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

गेल्या सहा वर्षांत तालुक्यासाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी आणून रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा, शेती, शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या कामांना गती दिल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनच या निधीची प्रभावी अंमलबजावणी होते, त्यामुळे खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती हे सर्व एकाच विचाराचे असतील तरच विकासाला खरी चालना मिळते, असे ते म्हणाले.

दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे अत्याधुनिक रूपांतर, भविष्यात ५० खाटांचे रुग्णालय, सीटी-स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे यांसारख्या सुविधा, टाकळीवाडी उपकेंद्राची मंजुरी, क्षारपड सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान, एमआयडीसीद्वारे रोजगारनिर्मिती, नळ पाणीपुरवठा योजना, तालुका क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमसृष्टी, स्मार्ट जिल्हा परिषद शाळा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या योजनांचा आढावा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घेतला.

केवळ राजकारण न करता कामाच्या आधारे मत मागण्याची भूमिका मांडत, विकासासाठी एकजूट आणि एकविचार आवश्यक असल्याचे आमदार यड्रावकर यांनी ठामपणे सांगितले.

या प्रसंगी कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनिषा डांगे, प्रमोददादा पाटील, जिल्हा परिषदेचे उमेदवार उत्तरादेवी शिंदे, पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब वनकोरे, भवानिसिंह घोरपडे यांची मनोगते झाली. 

या सभेस अमरसिंह पाटील, जवाहर पाटील, अक्षय आलासे, सरपंच अनिता कडाके, धन्यकुमार सिदनाळे, विजितसिंह शिंदे, प्रकाश चौगुले, संजय पाटील, जितेंद्र देसाई यांच्यासह शाहू आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने