Top News

छत्रपती ग्रुपच्या मावळ्यांचा गावोगावी प्रचार; दत्तवाड मतदार संघात शाहू आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

बाळासो कोकणे / शिवार न्यूज नेटवर्क :

दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात राजर्षी शाहू विकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार उत्तरादेवी शिंदे, पंचायत समितीचे उमेदवार अविनाश पाटील व बाबासाहेब वनकोरे यांच्या पाठीशी छत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते व मावळे ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांनी केले. या मतदारसंघातून उमेदवारांना मोठे मताधिक्य देऊन निवडून आणत विकासाच्या गतीला आणखी चालना देण्यासाठी छत्रपती ग्रुप अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रमोददादा पाटील म्हणाले की, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव प्रगती झाली आहे. या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विचारशील, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ लोकप्रतिनिधी असणे अत्यंत आवश्यक आहे. ही गरज ओळखून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सक्षम आणि विश्वासार्ह उमेदवारांना संधी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती ग्रुपच्या वतीने गावोगावी प्रभावी प्रचारयंत्रणा राबवली जात असून प्रत्येक गावात राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांशी थेट संवाद साधत विकासकामांचा आढावा घेतला जात असून आगामी काळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

उत्तरादेवी शिंदे, अविनाश पाटील व बाबासाहेब वनकोरे हे तिन्ही उमेदवार विकासाचा ठोस अजेंडा घेऊन जनतेसमोर जात आहेत. पारदर्शक प्रशासन, लोकाभिमुख कामकाज आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार निश्चितच विजयी होतील, यात कोणतीही शंका नसल्याचा ठाम विश्वास प्रमोददादा पाटील यांनी व्यक्त केला.

थोडे नवीन जरा जुने