शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शिरोळ तालुक्यातील संपूर्ण युवावर्ग आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, या निवडणुकीतही महायुतीच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला सर्वच जागांवर निवडून देण्याचा संकल्प युवकांनी केला आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिरोळ तालुकाध्यक्ष दिग्विजय माने यांनी व्यक्त केला.
दिग्विजय माने म्हणाले की, शिरोळ तालुक्याच्या इतिहासात आजवर अनेक आमदार झाले. त्यांच्या योगदानाला नाकारता येणार नाही; मात्र केवळ पाच वर्षांच्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तब्बल २ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून खेचून आणून शिरोळ विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला. आदरणीय आमदार यड्रावकर हे विकासाच्या दृष्टीने शिरोळ तालुक्याचा कायापालट करीत आहेत.
तालुक्यातील युवकांच्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी शिरोळ येथे सात एकर जागेवर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याची मंजुरी मिळवून देण्यात आली असून त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी एक कोटी रुपये प्रत्यक्ष जमा झाले असून उर्वरित निधी लवकरच उपलब्ध होणार आहे. सैन्यदल, पोलीस भरती, कुस्ती, कबड्डी यांसारख्या क्रीडा प्रकारात आघाडीवर असलेल्या युवकांना आता सर्व सुविधा एका छताखाली मिळणार असल्याने तालुक्यातील क्रीडा संस्कृतीला नवी चालना मिळणार आहे.
देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असताना, शिरोळ तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या दूरदृष्टीतून औद्योगिक वसाहत मंजूर करून देण्यात आली. यामुळे स्थानिक युवकांच्या उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन मिळून रोजगारनिर्मितीला मोठी गती मिळाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मिरवणुकीपुरते मर्यादित नसून ते विचार, आचार आणि संस्कारांचा विषय आहेत, ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून जयसिंगपूर येथे महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. त्यासोबतच युवकांवर संस्कार व्हावेत यासाठी महाराजांच्या जीवनावर आधारित संग्रहालय उभारण्यात आले आहे. याचबरोबर जयसिंगपूर शहरात गेल्या 40 वर्षाचे स्वप्न असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न केला.
याशिवाय इंग्लंडमधील लॉर्ड्स स्टेडियमच्या धर्तीवर २८ कोटी रुपये खर्चून उभारलेले शाहू स्टेडियम, उदगाव येथे सुरू करण्यात आलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे ३०० बेडचे मनोरुग्णालय, दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाची नवी इमारत, तालुक्यातील सर्व प्रकारचे रस्ते, तीन शहरांच्या नगरपरिषदांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी, २० कोटी रुपये खर्चून उभारलेली जयसिंगपूर नगरपरिषदेची भव्य इमारत तसेच आरोग्य राज्यमंत्री असताना तालुक्यात उपलब्ध करून दिलेल्या ॲम्बुलन्स सेवा ही विकासाची ठोस उदाहरणे असल्याचे दिग्विजय माने यांनी सांगितले.
या सर्व कामांच्या जोरावर शिरोळ तालुक्यातील युवक आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आगामी निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील, असा ठाम विश्वास दिग्विजय माने यांनी व्यक्त केला.
