Top News

हेरवाड गावभाग येथील आदिशक्ती संतुबाई मंदिराचा २४ रोजी स्लॅब समारंभ

 गुरुवर्य देवव्रत उर्फ राणोजी वासकर महाराज यांच्या शुभहस्ते होणार धार्मिक सोहळा

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड गावभाग येथील सुप्रसिद्ध जागृत श्रद्धास्थान व ग्रामदैवत श्री देवी आदिशक्ती संतुबाई मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे जात असून, मंदिराच्या स्लॅबचा शुभारंभ सोहळा शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे. संपूर्ण गावाच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प कारण्यात आला होता. त्या संकल्पाची पूर्तता होत असताना आज मंदिर उभारणीच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. स्लॅब समारंभ हा मंदिराच्या बांधकामातील महत्त्वाचा आणि शुभ मानला जाणारा टप्पा असल्याने हा सोहळा सामूहिक आनंदाने व भक्तिभावाने साजरा करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

या पावन सोहळ्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे विद्यावंशज ह.भ.प. गुरुवर्य श्री देवव्रत उर्फ राणोजी विवेकानंद वासकर महाराज प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते मंदिराचा स्लॅब समारंभ पार पडणार आहे.

या निमित्ताने गावातील प्रत्येक कुटुंबाने दुरडी, आंबील, नैवेद्य तसेच समारंभासाठी शोभा वाढवणाऱ्या वस्तू घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या धार्मिक व सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांनी सहभागी होऊन देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण करावी, असे आवाहन श्री संतुबाई नवरात्रौत्सव मंडळ, समस्त धनगर समाज व समस्त ग्रामस्थ हेरवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने