अब्दुललाट येथे श्रद्धा गायकवाड व मिलिंद कुरणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
अब्दुललाट / शिवार न्यूज नेटवर्क :
अब्दुललाट जिल्हा परिषद मतदार संघाला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला आहे. या विकास निधीच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा कायापालट करून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. या जिल्हा परिषद मतदार संघाचा विकास यापुढे देखील अविरत सुरू ठेवण्यासाठी एकविचारी उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे त्यामुळे शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, यापुढे देखील या मतदार संघात निधीचा महापुर आणू, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
अब्दुललाट येथे राजर्षी शाहू विकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रद्धा गायकवाड व पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते.
शिरोळ तालुक्याचा विकास साधत असताना आम्ही कधीही मतांचा आकडा पाहिला नाही. सर्व गावांचा सर्व समावेशक विकास केला आहे. शिरोळ तालुक्यात २ हजार कोटींचा विकास झाला आहे. रस्ते, गटारी होत राहतील पण मतदार संघातील सर्वसामान्य जनता कशा पद्धतीने आर्थिक सक्षम बनेल यासाठी आम्ही यापुढे काम करणार असल्याचे सांगून प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून देणार असल्याचे सांगितले. शिरोळ तालुक्याला पर्यटन हब आणि मेडिकल हब बनवण्याचे काम सुरु आहे. जेणेकरून शिरोळ तालुक्यात येणारा पर्यटक दिवसभर शिरोळ तालुक्यात रेंगाळत राहिला पाहिजे. राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्वच उमेदवार प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ आहेत ते निवडून आल्यानंतर निश्चितच या मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. यापुढेही या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी शाहू आघाडी मैदानात उतरली आहे. सर्वसामान्य उमेदवार या आघाडीने दिले आहेत. या मतदारसंघाचा विकास करण्याची ताकद या उमेदवारांच्यात असल्याने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार श्रद्धा गायकवाड, पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे यांनी आपल्या मनोगतातुन मतदार संघाचे विकासाचे व्हिजन स्पष्ट केले. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत आवळे, जयश्री आवळे त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश केला. याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या प्रचार शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे, माजी जि. प. सदस्य दादा सांगावे, माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी, महावीर सांगावे, पायगोंडा पाटील, संजय परीट, रावसाहेब पाटील, पार्वती सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन शाबगोडा पाटील, अविनाश गायकवाड, शानाबाई कोळी, अविनाश काळे, संजय कोळी, जे. जे. पाटील, एस. के. पाटील, आप्पासाहेब चौगुले, प्रशांत आवळे, सागर सांगावे, वृषभ कोळी, भगेंद्र सलगर, दिनकर आवळे यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
