Top News

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखेत बदल मतदान ७ फेब्रुवारीला, मतमोजणी ९ फेब्रुवारीला ; उमेदवारांना प्रचारासाठी मुदतवाढ



मुंबई : 

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार आता मतदान शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणी रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. शासकीय दुखवट्याच्या कालावधीत प्रचार, सभा व अन्य निवडणूक प्रक्रियांवर मर्यादा येत असल्याने निवडणूक कार्यक्रमात आवश्यक बदल करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रचारासाठी आणखी दोन दिवसांची अतिरिक्त मुदत मिळाली आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी उमेदवारांना अधिक वेळ उपलब्ध होणार आहे. निवडणूक यंत्रणांनीही सुधारित कार्यक्रमानुसार तयारी सुरू केली असून मतदान केंद्रे, सुरक्षा व्यवस्था आणि मतमोजणीची प्रक्रिया याबाबत आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व मतदारांनी सुधारित तारखांची नोंद घ्यावी, तसेच निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

नवीन कार्यक्रमानुसार जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता होईल. तर 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता तात्काळ संपुष्टात येईल.

थोडे नवीन जरा जुने