अर्जुनवाड येथे शाहू आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ संपन्न
अर्जुनवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
मतांच्या आकड्यांपेक्षा गावांच्या गरजा ओळखून विकासाला प्राधान्य दिल्यामुळे गेल्या पाच–सात वर्षांत तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरु आहे. अर्जुनवाड गावात सुमारे ८ कोटी ७३ लाख रुपयांची विकासकामे झाली असून संपूर्ण तालुक्यात जवळपास २००० कोटी रुपयांच्या माध्यमातून निधी रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, समाजमंदिरे आणि आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्यात आला आहे. ३७ गावांत फिल्टरयुक्त पाणीपुरवठा, १००० बेडपर्यंत वाढवलेली आरोग्य व्यवस्था, नवीन एमआयडीसीद्वारे रोजगारनिर्मिती आणि क्षारपटग्रस्त शेतीसाठी ८० टक्के अनुदानाची योजना अशा सुमारे २ हजार कोटी रुपयांची विकास कामे शिरोळ तालुक्यात राबविण्यात आली आहेत. या विकासाची गंगा सुरू ठेवण्यासाठी अर्जुनवाड जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उदगांव जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार अमोल चव्हाण व पंचायत समितीचे उमेदवार सीमा म्हैशाळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ अर्जुनवाड येथील अर्जुनेश्वर मंदिर येथे करण्यात आला. या ठिकाणी आयोजित सभेत आमदार यड्रावकर बोलत होते. स्वागत माजी सरपंच विकास पाटील यांनी केले.
शिरोळ तालुक्यात ५० बेडचे ग्रामीण रुग्णालय, ४२० बेडचे मनोरुग्णालय, ३० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल व १०० बेडचे ‘आयुष' रुग्णालय प्रस्तावित आहेत. यामुळे एकाही नागरिकाला तालुक्याबाहेर उपचारासाठी जाण्याची गरज राहणार नाही.
रोजगार निर्मितीसाठी नवीन एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्याचा उद्देश आहे. शेतीतील क्षारपट्टी समस्येसाठी ८० टक्के अनुदानाची योजना राज्य शासनाने मंजूर केली. पुढील काळात उद्योग, व्यापार व पर्यटन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. कन्या गट प्रकल्पांतून धार्मिक व पर्यटनस्थळांचा विकास करून तालुक्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त करून या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे उमेदवार अमोल चव्हाण व पंचायत समितीचे उमेदवार सीमा म्हैसाळे यांना विजयी करा जेणेकरून एकविचारी नेतृत्वातून शिरोळ तालुक्याच्या विकासाला गती मिळेल असे सांगितले.
माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, उदगांव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य पदापासून ते सभापतीपदी पर्यंत गेलेला इतिहास आहे, त्यामुळे शाहू आघाडीचे उमेदवारही निवडूण येवून सभापती पर्यंत जातील असा विश्वास व्यक्त केला. या मतदार संघात माणूसकी जपण्याचं काम अर्जुनवाड आणि उदगांव जिल्हा परिषद मतदार संघातील आमच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे शाहू आघाडीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
यावेळी हिम्मत पाटील, नंदकुमार पाटील, सतिश मलमे, संतोष जाधव, मुसा इनामदार, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनिषा डांगे, पंचायत समितीच्या उमेदवार सीमा म्हैशाळे, जिल्हा परिषदेचे उमेदवार अमोल चव्हाण यांची मनोगते झाली.
या प्रसंगी माजी अमरसिंह पाटील, नगरसेविका श्वेता जाधव, कविता चौगुले, प्रदिप पाटील, सरपंच अर्चना थोरात, अशोक चौगुले, परसू देशिंगे, नंदाताई खोत, घालवाडचे सरपंच सुहास खाडे, कनवाडचे सरपंच इरफान बुराण, संपत कोळी, शोभाताई कोळी, बबन पाटील, अमोल पाटील, भाऊसो खडके, सुभाष चव्हाण आण्णा नारींगकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार चंद्रकांत मोरे यांनी मानले.
