Top News

दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघ : राजकारणात अवैध व्यवसायांशी संबंध असलेली माणसे पुढे आली, तर तरुण पिढीने कोणता आदर्श घ्यायचा ?

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा सुरू झाली असून, तिन पाणी जुगार, मटका आणि दारू यांसारख्या अवैध व समाजाला घातक ठरणाऱ्या व्यवसायांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मतदारसंघात जुगाराचा व्यवसाय व दारूची दुकाने वाढू नयेत, अशी अपेक्षा सामान्य नागरिक, विशेषतः युवक वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. राजकारणात अशा प्रकारच्या व्यवसायांशी संबंध असलेली माणसे पुढे आली, तर तरुण पिढीने कोणता आदर्श घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांकडून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेतृत्वाकडून या विषयावर स्पष्ट भूमिका अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.

मतदारसंघातील सुजाण नागरिकांच्या मते, गावगुंडगिरी, तडीपारी कारवाया झालेली व्यक्ती, मटका व दारू व्यवसायातून तरुणांना व्यसनाधीनतेकडे ढकलणारे घटक राजकीय प्रवाहापासून दूर ठेवले गेले पाहिजेत. अशा प्रवृत्तींना पाठबळ दिले जाणार नाही, याची स्पष्टता समाजाला हवी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, मतदारसंघात समाजसुधारणा, स्वच्छ राजकारण आणि लोकहिताचा विचार जपणाऱ्या विचारधारेचा अवमान होऊ नये, अशीही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या काळात दत्तवाड मतदारसंघातील निवडणूक प्रचार समाजाला घातक ठरणाऱ्या दुहेरी धंद्यांभोवती फिरणार की विकास आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर केंद्रीत राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

थोडे नवीन जरा जुने