शिरोळ तालुक्यातील बहुतांशी महिलांना होणार योजनेचा लाभ : आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढवण्यात आली असून महिलांसाठी 65 वर्षापर्यंत वयोगट वाढविण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक गांवे कर्नाटक राज्याच्या सिमेवर असून कर्नाटक राज्यातील अनेक मुलींचे लग्न शिरोळ तालुक्यात झाले असून अशा सर्वच महिलांना अधिवास दाखल्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या सर्व अटी राज्य सरकारने शिथिल करुन महिलेच्या पतीचा जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला ग्राह्य धरला जाणार असल्याने शिरोळ तालुक्यातील बहुतांशी महिलांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना प्रशासनाच्या वतीने कोणतीही अडचण येणार नाही, याचीही दक्षता घेतली असल्याची माहिती आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
यावेळी माहिती देताना ते म्हणाले, महिलांच्या उन्नतीसाठी आणि उज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने ही योजना आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांच्या दूरदृष्टीतून राबविण्यात आलेली ही योजना महिलांसाठी कायमस्वरूपी राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे. आता अर्ज करण्यासाठी 2 महिन्यांनी मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थी महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दर माह 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत. योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणार्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. 2.5 लाख रुपयांचा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी 46 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना सरकार दरमहा 1 हजार 500 रुपये देणार आहे. या योजनेचा लाभ विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार सर्व स्तरातील महिलांना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
.jpg)