वैद्यकिय कामी शेतकऱ्यांना होते मदत; एफआरपी पेक्षा प्रतिटन २०० रुपये मिळते अतिरिक्त
अभिनंदन सुंके / शिवार न्यूज नेटवर्क :
गुरुदत्त शुगर्स ने नेहमी शेतकरी हा केंद्रस्थानी ठेऊन अनेक ऊसविकास योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत राबवल्या आहेत. या योजनेतून हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांचे एकरी ऊस उत्पादनात देखील वाढ झालेली आहे. उच्चांकी ऊस दरासोबतच कारखान्याने 'शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता व त्यांच्या कुटूंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावेत या उदेदशाने' गुरुदत्त किसान कार्ड' ही अभिनव योजना राबवली आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
'गुरूदत्त किसान कार्ड' योजनेची माहिती देताना कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे म्हणाले, ही योजना सन २०१७- १८ वर्षांच्या गळीत हंगामापासून सुरु करण्यात आली. या योजनेतून शेतकऱ्यांच्या कुंटूबियांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डिलिव्हरी, हर्नीया, अपेंडिक्स, डेंग्यू, मलेरिया, काविळ, लहान मुलांचे विविध आजार, अपघाती जखमी झाल्यास होणारे उपचार, पेशी कमि होणे यासारख्या विविध उपचार व शस्त्रक्रियेसाठी ३० हजार रुपयांचे वैद्यकिय विम्याचे कवच दिले आहे. तसेच एखादया शेतकऱ्याचा जर विजेचा शॉक बसून, पाण्यात बुडून, झाडावरून पडून, सर्प दंश होऊन, रस्ते अपघातात दुर्देवाने मृत्यू झाल्यास तातडीने १ लाख रूपयांची मदत दिली जाते.
तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रति किलो ५ रु दराने प्रति टन २ किलो साखर दिली जाते. तसेच गळीतास आलेत्या ऊसाला एफ.आर.पी. पेक्षा २०० रु प्रति मे.टन इतका जादा दर दिला जातो. कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे . या योजने अंतर्गत आजपर्यंत ६३२० कुटूंबियांना या योजनेचा लाभ घेतला असून २०० हून अधिक शेतकऱ्यांना विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी प्रत्यक्ष मदत झाली आहे .
