इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेने सर्वसमावेशक समिती गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या समितीमार्फत नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुचवून त्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व सहकाऱ्यांनी 20 एप्रिल रोजी “पंचगंगा प्रदूषण रोखा, अन्यथा मेपासून आमरण उपोषण” असा इशारा देत निवेदन दिले होते. त्यानंतर 27 एप्रिल रोजी महानगरपालिकेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
समितीच्या अध्यक्षपदी महापौर उदय धातुंडे तर सचिवपदी आयुक्त पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये उपमहापौर अनिल डाळया, नगरसेवक विठ्ठल चोपडे, राजू बोद्रे, मनिषा नवनाळे, भाऊसो आवळे, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व बंडू बरगाले, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, पंचगंगा प्रदूषण मुक्ती संघर्ष समितीचे बजरंग लोणारी, प्रोसेसिंग असोसिएशनचे मारुती पन्हाळकर व संदीप मोधे, सायझिंग असोसिएशनचे प्रकाश गौड व बंडोपंत लाड, प्रेस क्लबचे अरुण काशिद तसेच पर्यावरण अधिकारी पियुष जाधव यांचा समावेश आहे.
या समितीचे प्रमुख कार्य म्हणजे एसटीपी व सीईटीपी प्रकल्पांची पाहणी करणे, प्रक्रिया योग्यरित्या पार पडते का याची खातरजमा करणे, पाण्याचे नमुने तपासणे तसेच प्रदूषणाचे स्रोत शोधून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवणे होय.
समिती वेळोवेळी बैठक घेऊन अहवाल सादर करणार असून, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
