इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
इचलकरंजी शहरातील काळ्या ओढ्याच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. आंदोलक, महापालिका प्रशासन आणि प्रोसेस उद्योग प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ओढ्यावर पक्का बांध उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील आदेशापर्यंत प्रोसेस कारखाने बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे.
या बैठकीस महापौर, आयुक्त, उपमहापौर, गटनेते तसेच सुमारे २५ नगरसेवक उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व प्रोसेस उद्योगांचे मालक यांचीदेखील उपस्थिती होती. बैठकीत प्रदूषणाच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
महापालिकेकडून प्रदूषणासंदर्भात स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीत महापालिका अधिकारी, प्रदूषण मंडळाचे प्रतिनिधी, नगरसेवक, आंदोलक आणि पत्रकारांचा समावेश असणार आहे. ही समिती एसटीपी (STP) आणि सीईटीपी (CETP) प्रकल्पांची सखोल पाहणी करणार आहे.
प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी वापरले जाते की ओढ्यात सोडले जाते, पाण्याचे नमुने तपासणे, किती प्रमाणात प्रोसेसचे पाणी सीईटीपीमध्ये येते व त्यावर योग्य प्रक्रिया होते का, याची तपासणी समिती करणार आहे. समितीच्या अहवालानंतरच प्रोसेस कारखाने पुन्हा सुरू करायचे की बंद ठेवायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, ३० एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्यास १ मेपासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा आंदोलक नेते धनाजी चुडमुंगे यांनी दिला.
या बैठकीस धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दिपक पाटील, विश्वास बालिघाटे, कॉ. अप्पा पाटील, नागेश काळे, बंडू बरगाले, सुनील कुरुंदवाडे, अयुब पट्टेकरी, संभाजी शिंदे, अप्पा कदम, धनाजी माने, रशीद मुल्ला, अक्षय पाटील, बंटी माळी, पोपट संकपाळ, आनंद भातमारे, महादेव काळे, शशिकांत काळे, अनिल हुपरीकर यांच्यासह पंचगंगा काठावरील गावांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निर्णयामुळे प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
