हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) मार्फत NCMC (National Common Mobility Card) कार्ड काढण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला असून, नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची आणि लाभदायक संधी उपलब्ध झाली आहे. मंगळवार, दि. 28 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळेत हा कॅम्प पार पडणार आहे.
एस.टी. प्रवासात विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे NCMC कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः महिलांना अर्धे तिकीट, 65 वर्षांवरील पुरुषांना अर्धे तिकीट, तसेच 75 वर्षांवरील महिला व पुरुषांना पूर्णतः मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. याशिवाय अपंग बांधवांना 75 टक्के सवलत मिळणार असल्याने हे कार्ड सर्व घटकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. कार्डसाठी केवळ 230 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सध्या हे कार्ड बंधनकारक नसले तरी भविष्यात एस.टी. बसमधील सवलतींचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक होणार असल्याने नागरिकांनी वेळ न दवडता कार्ड काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, कॅम्पमध्ये नोंदणी केल्यानंतर सुमारे एक महिन्याच्या कालावधीत संबंधित कार्ड तयार होऊन ते थेट गावातच उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना शहरात जाऊन त्रास घेण्याची गरज भासणार नाही.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमुळे हेरवाड व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे, तसेच ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
