Top News

शिरटी–नृसिंहवाडी मार्गावर केबल चोरीचे सत्र; 15-16 शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरटी ते नृसिंहवाडी दरम्यानच्या बुलाक परिसरातील शेतजमिनीत अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत इलेक्ट्रिकल मोटारींच्या तांब्याच्या केबल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या प्रकारात सुमारे 15 ते 16 शेतकऱ्यांचे अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वीही काही शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या वेळी शेतकऱ्यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांत पुन्हा केबल चोरीचे प्रमाण वाढले असून, उदगाव वीटभट्टी ते गौरवाड हद्दीपर्यंतच्या शिरटी महसूल क्षेत्रातील ब्लॉक शेती भाग चोरट्यांच्या निशाण्यावर आहे.

विशेष म्हणजे या मार्गावर दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, चोरट्यांनी हे कॅमेरेही फोडल्याने त्यांच्या धाडसाची प्रचिती येत आहे.

सध्या उन्हाळ्याचा काळ असल्याने शेतीसाठी पाण्याची गरज अधिक आहे. अशा परिस्थितीत मोटारींच्या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. परिणामी, पाण्याअभावी पिके वाळून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिरोळ पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच संबंधित भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या प्रकारामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

थोडे नवीन जरा जुने