हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
अब्दुललाट–हेरवाड मार्गावरील पुलाजवळील ओढ्यात चार ते साडेचार फूट लांबीची मगर दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना समजताच स्थानिक नागरिकांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली आणि खबरदारीची पावले उचलण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील यांनी प्रथम ही मगर पाहिल्यानंतर वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या सूचनेनुसार शिरोळ येथील सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली.
सर्पमित्रांच्या पथकाने योग्य दक्षता घेत ओढ्यातील मगर पकडण्याची मोहीम राबवली. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर ही मगर सुरक्षितरीत्या पकडण्यात आली. परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती, मात्र कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून सर्वांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आले.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, दयानंद पाटील, निगोंड पाटील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. पकडलेल्या मगरीला पुढील कारवाईसाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याच्या ठिकाणी जाताना सतर्कता बाळगावी, तसेच वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ संबंधित विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
