सुदर्शन पाटील / शिवार न्यूज नेटवर्क :
सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या 1994-95 बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल 31 वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देत बालमित्र पुन्हा एकत्र आल्याने शाळा परिसर आनंदाने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजल्यापासून माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने झाली. सर्वांनी प्रथम आपल्या गुरुवर्यांना वंदन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला. यावेळी व्ही. टी. पाटील, उदय पाटील, ए. ए. इंगवले, एम. एम. धुमाळे, एस. टी. गुरव, बी. एम. कुंभार, डी. एम. शेळके या शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.
माजी विद्यार्थी सयाजी पाटील, रणजीत पाटील, सदानंद पाटील, अजय बिरणगे, हणमंत पाटील, रेखा पाटील आणि माया खोत यांनीही आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगत वातावरण भारावून टाकले. विशेष म्हणजे विवाहित विद्यार्थिनींनीही सासरहून वेळ काढून उपस्थिती लावली.
कार्यक्रमात सर्वांनी आकर्षक फेटे परिधान करून शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला, ज्यामुळे सोहळ्याला वेगळेच रंगतदार रूप प्राप्त झाले. यानंतर अल्पोपहार व सॉफ्ट ड्रिंक्सची व्यवस्था करण्यात आली. दुपारी सर्वांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला.
शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे या बॅचमधील अनेक विद्यार्थ्यांनी नोकरी, उद्योग, शेती तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनोरंजनासाठी संगीत खुर्चीसह विविध खेळांचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी रजपूत हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील पाटील, माणिक पाटील, अनिल पाटील, अरुण पाटील, संतोष गायकवाड, सुधाकर कणेरे आणि मदन वासमकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सायंकाळी निरोप घेताना बालमित्रांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. भविष्यातही असे स्नेहमेळावे आयोजित करून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
