Top News

2 तासांत घरफोडीचा गुन्हा उघड: महिला आरोपी ताब्यात; 6.20 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या दोन तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत संशयित महिला आरोपीस ताब्यात घेतले असून तिच्याकडून सुमारे 60 ग्रॅम वजनाचे 6 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीकांत तातोबा चिवटे (वय 58, रा. उदगाव, ता. शिरोळ) यांच्या राहत्या घरी दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.15 ते 8.10 या वेळेत अज्ञात चोरट्याने कुलूप चावीने उघडून घरात प्रवेश केला व तिजोरीतील सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने वेगाने हालचाल केली. दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल जावेद आंबेकरी यांना गोपनीय माहिती मिळाली की, उदगाव येथील सौ. रुपाली संजय संकपाळ (वय 43) हिनेच ही चोरी केली असून ती चोरीचे सोने बँकेत ठेवून कर्ज काढण्याच्या तयारीत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित महिलेस ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र कौशल्यपूर्ण चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या घरातून सुमारे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, नेकलेस, चेन, अंगठ्या व कानातले असा एकूण 6,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गोरे, पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, ताहीर मुल्ला, युनुस इनामदार, जावेद आंबेकरी, रहीमान शेख, शुभम घाटगे, प्रिया कदम तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी केली.या घटनेमुळे पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

थोडे नवीन जरा जुने