जयसिंगपूर/शिवार न्यूज नेटवर्क
सामान्य शेतकर्यांच्या हितासाठीच जिल्हा बँकेची स्थापना झाली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारणाचा चेहरा-मोहरा बदलायचा असेल तर शेवटच्या माणसापर्यंत जिल्हा बँक पोहोचली पाहिजे. त्यादृष्टीने बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू आहेत. विकास सेवा सोसायट्या सक्षम असल्या पाहिजेत, त्या नफ्यात चालल्या पाहिजेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सेवा सोसायट्या अधिक बळकट करण्यासाठी आपले प्राधान्य राहील. सहकाराचा वारसा सांगणार्या शिरोळ तालुक्यात अनेक सेवा संस्था नफ्यात असल्या आणि उत्तम काम करीत असल्या तरी उर्वरीत संस्थाही नफ्यात चालविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, माजी मंत्री, आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजनांची माहिती शेतकर्यांना व्हावी, तसेच सेवा सोसायट्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जयसिंगपूर येथील इदगाह हॉल येथे शिरोळ तालुका विकास सेवा संस्थांची आढावा बैठक झाली. प्रति वर्षाप्रमाणे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या बैठकीचे स्वतः आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक ए.बी.माने, नाबार्डचे व्यवसाय विकास अधिकारी आशितोष जाधव प्रमुख उपस्थित होते. आढावा बैठकीसाठी शिरोळ तालुक्यातील सर्व सेवा सोसायट्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ व सेक्रेटरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व विकास सेवा संस्थांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सेवा सोसायट्या व जिल्हा बँकेचे अधिकारी यांची एकत्रित बैठक गेल्या सात वर्षापासून घेण्यात येते असे स्पष्ट करून आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षाच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात बैठक झाली नाही. या काळात सोसायटीच्या स्तरावर अडचणींचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. सोसायट्यांनी शेतकर्यांना कर्ज देणे व त्याची वसुली करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता नाबार्डच्या योजनांच्या माध्यमातून अधिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत.
कोल्हापूर जिल्हा हा सहकाराचा अग्रणी समजला जातो. राज्याने, देशानेच नव्हे तर जगाने आदर्श घ्यावा अशा पध्दतीने सहकार चालविण्याची परंपरा या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. जिल्हा बँक ही येथील शेतकर्यांची मुख्य अर्थवाहिनी आहे. ही बँक प्रशासकाच्या कारकिर्दीत अडचणीत आली. थकित कर्जाचे प्रमाण वाढले. मात्र कोणतेही कर्ज बँकेने विनातारण दिले नव्हते. यामुळेच बँक पुर्वपदावर आली. देशात आदर्श बँकांच्या पंक्तीत जिल्हा बँक डौलाने आहे. प्रशासकाच्या काळात बँकेत 2100 कोटी ठेवी होत्या. आज सुमारे 7450 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. सुमारे 5100 कोटी रूपयांची कर्जे बँकेने दिली आहेत. या ठेवी 10 हजार कोटी करण्याचे धोरण बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ साहेब व संचालक मंडळाचे आहे. बँकेचा ढोबळ नफा 180 कोटी रूपये झाला.
जिल्हा बँकेत ठेवी, कर्जे, वसुलीच्याबाबतीत शिरोळ तालुक्याचे वेगळे स्थान आहे. करवीरच्या तुलनेत शिरोळ तालुका नेहमीच अव्वल राहिला आहे. जिल्ह्यात सहकार रूजला, त्याचे खरे बिज शिरोळ तालुक्याने जिल्ह्यात लावले. यामुळेच शिरोळ तालुका सातत्याने अग्रेसर आहे. शेतकर्यांच्या कर्जाचा व्याजदर कमी करण्याची भूमिका मी संचालक मंडळाच्या बैठकीत मांडली. त्यानंतर कपातही झाली. मात्र अजूनही व्याजदर कमी व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार यड्रावकर म्हणाले. घेतलेले कर्ज प्रामाणिकपणे परतफेड करण्याची परंपरा शिरोळ तालुक्यात आहे. मात्र शेतकर्यांच्या कर्जाला परवडेल असा व्याजदर असला पाहिजे. यामुळे बँकही अडचणीत येवू नये व शेतकर्यांनाही दिलासा मिळाला पाहिजे, सोसायटी टिकली पाहिजे या दृष्टीने व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न राहतील. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेचे कर्ज फायद्याचे असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, शेतकर्यांना दिल्या जाणार्या कर्जाची हमी सेवा संस्थांचे संचालक घेतात तर विश्वासातील सचिव नेमण्याचा अधिकार आम्हाला का असू नये. संस्था सक्षम चालण्यासाठी आराखडा तयार करावा. सहकाराच्या माध्यमातून सामान्य शेतकर्यांपर्यंत ही अर्थवाहिनी न्यायची आहे. सामान्य माणसासाठी केलेल्या एटीएमसह अन्य सुविधा त्रुटी दूर करून सुरू राहिल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील सक्षम सोसायट्यांनी मायक्रो एटीएम सुविधा सुरू करावी. जिल्हा बँकेने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना एटीएम कार्ड द्यावे. यामुळे त्यांना बँकेसमोर पैशासाठी प्रतिक्षा करावी लागणार नाही, गावपातळीवर सहजरित्या पैसे उपलब्ध होतील. म्हैस खरेदीसाठी शेतकर्यांना कोणत्याही दूध संस्थेच्या हमीपत्राशिवाय कर्ज उपलब्ध व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नाबार्ड व केंद्र शासनाच्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी नाबार्डचे व्यवसाय विकास अधिकारी आशितोष जाधव यांनी नाबार्डच्या विविध योजनांची माहिती दिली. सोसायट्यांनी फक्त पीक कर्जावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य पर्याय शोधले पाहिजेत. काही सोसायट्यांची गोडावून, अवजार बँक, गिरणी आहे. या पध्दतीच्या व्यवसायासाठी 2 कोटीपर्यंतची रक्कम सोसायटी कर्ज म्हणून घेवू शकते. गोदाम बांधकाम, अवजार बँक, प्रोसेसिंग युनिट, शितगृह सोसायट्यांनी उभारावीत. शिरोळ तालुक्यातील अनेक सोसायट्या नफ्यात असून या संस्थांनी योजनांचा लाभ घ्यावा. जागा असेल तर सोलर युनिट उभारावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी बँकेचे विभागीय अधिकारी एम.जी.दिवटे यांनी स्वागत तर शेती व कर्ज विभागाचे व्यवस्थापक सी.ए.रावण यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बँकेचे अकौंटंट बँकींग व ठेव विभागाचे व्यवस्थापक विकास जगताप यांनी बँकेच्या ठेवीसह अन्य योजनांची माहिती दिली. सेवा सोसायट्यांच्या समोरील अडचणीबाबत विचारलेल्या सोसायट्यांच्या पदाधिकार्यांच्या प्रश्नांचे निरसन संचालक डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व बँकेचे कार्यकारी संचालक ए.बी.माने यांनी केले. ठेवीचे 100 टक्केहून अधिक उद्दीष्ट पुर्ण करणार्या सोसायट्या तसेच संस्था पातळीवर 100 टक्के कर्ज वसुली करणार्या सोसायट्यांचे पदाधिकारी व बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. जयसिंग खोंद्रे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले.
याप्रसंगी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, प्रकाश पाटील टाकवडेकर, भालचंद्र कागले, सुरेश शहापुरे, सुभाषसिंग रजपूत, दत्त साखरचे संचालक रणजीतसिंह कदम, इकबाल बैरागदार, चंद्रकांत जोंग, प्रताप उर्फ बाबा पाटील, संजय नांदणे, मदन मस्के, धनगोंडा पाटील, नंदकुमार पाटील, जयपाल कुंभोजे, बाबासाहेब भोकरे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
