जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या एका आरोपीकडून बेकायदा धारदार चाकू जप्त करून जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, १३५ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक मुकुंद गायकवाड (वय ४२, रा. चिपरी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याला यापूर्वी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र, हद्दपारीचा आदेश लागू असतानाही तो दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर येथील गल्ली क्रमांक ६, संजीवन हॉस्पिटलसमोर फिरताना आढळून आला.
यावेळी आरोपीच्या ताब्यात अंदाजे ३० सेंटीमीटर लांबीचा, लोखंडी मुठ असलेला, टोकदार व धारदार प्राणघातक चाकू बेकायदेशीररीत्या आढळून आला. या चाकूची किंमत सुमारे ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
हद्दपारीचा आदेश मोडून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केल्याने तसेच लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जावेद दस्तगीर आंबेकरी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यावरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, पोहेकॉ महेश कोरे, पोहेकॉ ताहीर मुल्ला आणि पोलीस कॉन्स्टेबल जावेद आंबेकरी यांच्या पथकाने केली. गुन्ह्याची नोंद पोहेकॉ मोहसीन कुलकर्णी यांनी केली असून पुढील तपास पोहेकॉ महेश कोरे करत आहेत.
