जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :
लग्नानंतर विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास देत माहेरहून पैसे, सोन्याची चैन आणि चांदीचे ब्रेसलेट आणण्याची मागणी केल्याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. साक्षी शिवानंद बनसोडे (वय २३, रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली, सध्या रा. कोथळी, ता. शिरोळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवानंद संभाजी बनसोडे (पती), श्रीमती आनिता संभाजी बनसोडे (सासू) आणि प्रियांका रणजीत दंडवते (नणंद), सर्व रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १० मे २०२४ रोजी विवाह झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांपासून ते १४ जुलै २०२६ पर्यंत आरोपींनी वेळोवेळी फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. "तुला जेवण करता येत नाही", "तुझ्या माहेरच्यांनी लग्नात मानपान केले नाही", "प्रत्येक सणाला ५ हजार रुपयांच्या साड्या घेत नाहीत" अशा शब्दांत वारंवार अपमान करण्यात आला.
याशिवाय, पतीने माहेरहून सोन्याची चैन, चांदीचे ब्रेसलेट आणि ५० हजार रुपये आण, अशी मागणी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. मागणी पूर्ण न झाल्याने तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
