जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर शहरातील एका तंबाखू व्यापाऱ्याच्या कार्यालयातून अकाउंटंटच्या बॅगेत ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील महावीर शिरगावे (वय २९, रा. शिरटी, ता. शिरोळ) हे जयसिंगपूर येथील गल्ली क्रमांक ७ मधील तंबाखू व्यापारी योगेश सारस्वत यांच्याकडे अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. सोमवार (दि. ३ ऑगस्ट) रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४.३० या कालावधीत कार्यालय उघडे असताना, त्यांच्या बॅगेत ठेवलेली ५०० रुपयांच्या ८० नोटांची, एकूण ४० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
घटनेनंतर निखील शिरगावे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबर करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे. शहरातील व्यापारी व नागरिकांनीही अशा घटनांमुळे चिंता व्यक्त केली असून, पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
