Top News

गर्भलिंग निदान प्रकरणातील मुख्य सूत्रधार स्वप्निल पाटील एजंटांसह जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर । शिवार न्यूज नेटवर्क :

बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात फरारी असलेला मुख्य आरोपी स्वप्निल केरबा पाटील याला त्याच्या दोन एजंटांसह करवीर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, चारचाकी वाहन, मोबाईल फोन असा सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम, गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (PCPNDT) कायदा आणि वैद्यकीय गर्भपात कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्निल केरबा पाटील हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त माहिती मिळाली की, स्वप्निल पाटील हा कागल–मुरगूड मार्गावरील पिंपळगाव खुर्द येथे पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह गर्भलिंग तपासणीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून स्वप्निल पाटील याला त्याचे एजंट संतोष ज्ञानदेव कोळी (रा. मडिलगे, ता. भुदरगड) आणि नंदकुमार भिमराव पाटील (रा. आरवडे, ता. तासगाव, जि. सांगली) यांच्यासह ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान आरोपींकडून सोनोस्कोप कंपनीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, चारचाकी वाहन, मोबाईल फोन असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील अन्य आरोपी डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड यांना न्यायालयाने ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

थोडे नवीन जरा जुने