जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :
डॉ. आप्पासाहेब सा. रे. पाटील उदगाव - जयसिंगपूर सहकारी बँकेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकिंग व्यवसायात कोल्हापूर जिल्ह्यात बँकेचा आठवा क्रमांक लागतो. सभासद व ग्राहकांच्या सोयी सुविधांसाठी संचालक मंडळांनी घेतलेले हिताचे निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम व सभासदांच्या विश्वासाच्या पाठबळावर निश्चितच बँक पाचव्या क्रमांकावर जाईल. येत्या दोन वर्षात १ हजार कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण करून आपली ही बँक शेड्युल बँक निश्चित करणारच असा विश्वास बँकेचे मार्गदर्शक संचालक, उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी व्यक्त केला.
येथील डॉ. एस. एस. भिर्डी सभागृहात डॉ. आप्पासाहेब सा. रे. पाटील उदगाव - जयसिंगपूर सहकारी बँकेची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी उद्यान पंडित गणपतराव पाटील बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्व. डॉ. अप्पासाहेब सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांनी केले. व्यवस्थापकीय संचालक राकेश दर्जे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. बँकेच्या आर्थिक वर्षात दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राकेश दर्जे माहिती देताना म्हणाले, आपल्या बँकेचे संस्थापक मार्गदर्शक व माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील त्यांच्या दूरदृष्टीतून सन 1960 मध्ये बँकेची स्थापना झाली. सहकार विश्वास आणि सामाजिक बांधिलकीची मूल्य जपत बँकेने बदलत्या काळाची गरज ओळखून कार्यपद्धतीत सातत्याने सकारात्मक बदल घडवले आहेत. बँकेच्या 20 शाखा मधून सभासद व ग्राहकांना सेवा देण्याचे काम सुरू आहे. सर्व बाबींचा समतोल साधून बँकेला अधिक सक्षम, आधुनिक, सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख बनवणे हे बँकेचे लक्ष आहे. सभासद, ठेवेदार, कर्जदार, ग्राहक आणि हितचिंतक यांनी बँकेवर दाखवलेला विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे या 67 वर्षात बँकेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकेचे एकूण 17 हजार 678 इतके सभासद आहेत. 31 मार्च 2026 रोजी बँकेच्या 51667. 02 लाख इतक्या ठेवी आहेत. कर्ज वाटप 27971.14 लाख इतके झाले आहेत. आर्थिक वर्षात बँकेला 2 कोटी 10 लाख 74 हजार 706 रुपयाचा नफा झाला आहे. ऑडिट वर्ग 'अ' मिळाले असून सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे. बँकेच्या डिजिटल व्यवहारात मोठी वाढ झाली असून दिवसाला सुमारे 6000 हून अधिक व्यवहार मोबाईल वरून होत आहेत. आधुनिक काळानुसार बँकेने बदल करत येत्या काळात 1 हजार कोटींचा ठेवीचा टप्पा निश्चित पूर्ण करेल आणि लवकरच शेड्युल बँकेचा दर्जा प्राप्त करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभासदांनी आपली बँक म्हणून या बँकेच्या प्रगतीसाठी ठेवी वाढीसाठी बँकेची उलाढाल वाढण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
यावेळी बँकेचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील म्हणाले, माजी आमदार, स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी बँकेची स्थापना केली. त्यांची दूरदृष्टी, संचालकांचे व कर्मचाऱ्यांचे परिश्रम तर सभासदांचे विश्वास यामुळे बँकेची सर्वदूर प्रगती सुरू आहे. लवकरच बँक शेड्युल बँक म्हणून मान्यता प्राप्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी नगरसेवक, उद्योगपती अशोकराव कोळेकर म्हणाले, बँकेची वाटचाल डिजिटल पद्धतीने सुरू आहे. काळानुसार सर्व व्यवहार बदलत चालले आहेत. शेतकरी कष्टकरी व्यापारी यांना फायदा व्हावा यासाठी डॉ. स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी बँकेची स्थापना केली. आता हजारो ग्राहकांच्या हातात बँक गेली आहे. ऑनलाइन पेमेंटचे बजेट आता वाढवण्याची गरज आहे. ग्राहकांना सुरक्षित व विश्वासाचे ठिकाण म्हणून बँकेची ओळख असल्यामुळे ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नवीन मुले आता मोबाईल वरून बँक कोणती स्वीकारायचे हे ठरवतात. त्यामुळे बँकेने डिजिटलकडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आणखी शाखा वाढवून शेअर्सची रक्कम वाढवली पाहिजे. शेड्युल बँक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. बँकेची सध्या नेत्रदीपक प्रगती सुरू असून सभासदांनी अशाच प्रकारे विश्वास ठेवून व्यवहार वाढवावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. नीता माने म्हणाल्या, तालुक्यातील एक दूरदृष्टी असलेला नेता म्हणजे गणपतराव पाटील हे आहेत. एखाद्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला त्याचा पक्ष, जात, पंथ न मानता प्रामाणिकपणे मदत करण्याची भावना त्यांच्यात आहे. तालुक्याला एक वेगळा विचार देण्याचे काम दादांनी केले आहे. जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात फेरबदल होत आहेत, अशा परिस्थितीत सर्व सहकारी संस्था अत्यंत सुरळीत चालवून एक वेगळे उदाहरण त्यांनी निर्माण केले आहे. अडचणीच्या काळात आम्हाला त्यांनी दिलेली मदत ही न विसरण्यासारखी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत तालुक्याला गणपतराव पाटील यांच्यासारखा लोकप्रतिनिधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पक्ष, गट - तट न पाहता दादांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे सांगून डॉ. निता माने अत्यंत भावूक झाल्या होत्या.
यावेळी बँकेचे तज्ञ संचालक शंकर मांगलेकर म्हणाले, नैसर्गिक आपत्ती यासह विविध कारणांमुळे जागतिक स्तरावर बँकिंग व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. अशा खडतर परिस्थितीत या बँकेने दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे. शिरोळ तालुक्यातील ज्या सहकारी बँका कार्यरत आहेत त्या सर्व बँकांच्या एकूण व्यवसायाच्या 40% व्यवसाय आपल्या बँकेचा आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून बँकेचा व्यवसायात आठवा नंबर आहे. मात्र येत्या काळात निश्चितच पाचव्या क्रमांकावर झेप घेईल. बँकेचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली बँकेचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, बँकेच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आत्मसात करतील येत्या काही वर्षातच बँक 1000 कोटीच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करून शेड्युल बँक होण्यासाठी प्रयत्न होतील प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची खाती आपल्या बँकेत सुरु करून बँकिंग व्यवहार वाढवण्यासाठी मदत करावी. बँकेच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांनी ज्या विचाराने या बँकेची स्थापना केली आहे. त्या विचाराचा वारसा पुढे नेत असताना या परिसरातील सर्वसामान्य घटक आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल यासाठी निश्चितपणे पुढाकार घेतला जाईल असे असा विश्वास शेवटी त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे जयसिंगपूर शहराध्यक्ष सुदर्शन कदम, आप्पासो बंडगर, के. आर. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक शिवाजी पोळ यांनी आभार मानले. चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन आप्पासो नरुटे, संचालक महादेव राजमाने, महेंद्र बागे, आण्णासाहेब पाटील, श्रेणीक कुडचे, राजेश सानिकोप, अशरफअली पटेल, रमेश पाटील, दिलीप पाटील, शरद गोधडे, बापूसो बोरगावे, श्रीमती विनया घोरपडे, सौ. अस्मिता पाटील, शंकर मांगलेकर, सुनील मुळे, धर्मराज व्हनमोरे, सौ. मेघा पाटील, मुख्य व्यवस्थापक विनायक कदम, असिस्टंट जनरल मॅनेजर मिलिंद जगदाळे, मनीष पुजारी यांच्यासह दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक दरगू गावडे, प्रमोद पाटील, इंद्रजीत पाटील, दिलीप पाटील कोथळीकर, नगरसेवक, रंगराव पवार, संजय पाटील - कोथळीकर, सर्जेराव पवार, गुंडाप्पा पवार, काँग्रेस शहराध्यक्ष सुदर्शन कदम यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर श्री दत्त उद्योग समूहातील संचालक मंडळ, अधिकारी डॉ. अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील शिरोळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ, अधिकारी संघ व बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
