Top News

राजेंद्रनगर घरफोडीचा गुन्हा उघड; जयसिंगपूर येथे सापळा रचून एकाला अटक ; १६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त

 


जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क : 

राजेंद्रनगर येथील बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका संशयिताला ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला. संशयिताकडून १०१.८६० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, मोबाईल, लोखंडी पकड, मुस आणि मोटारसायकल असा एकूण १६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

साची रेसीडेन्सी, टी-३, राजेंद्रनगर, कोल्हापूर येथे २४ जून रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेआठच्या दरम्यान ही चोरी झाली होती. बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पथकाने तपास सुरू केला.

दरम्यान, चोरीचे दागिने विक्रीसाठी एक व्यक्ती मोटारसायकलवरून अंकली पुलाजवळील स्मशानभूमी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १९ ऑगस्ट रोजी पथकाने अंकली पूल, जयसिंगपूर येथे सापळा रचून गणेश अरुण चव्हाण (वय ३१, रा. खाडे वस्ती, लक्ष्मीनगर, बेडग, ता. मिरज, जि. सांगली) याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर त्याने चोरीच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी ते आपल्याकडे देण्यात आल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून सोन्याची लगड, मोबाईल, चोरीसाठी वापरलेली साधने आणि मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

संशयित व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.

थोडे नवीन जरा जुने