Top News

विश्व बंधुत्व दिनानिमित्त दत्तवाड येथे २१ ऑगस्टला रक्तदान शिबिर

 


दत्तवाड । शिवार न्यूज नेटवर्क : 

विश्व बंधुत्व दिनानिमित्त तसेच परम आदरणीय राजयोगिनी दादी प्रकाश मणीजी यांच्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त दत्तवाड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत, दत्तवाड येथील बस स्टँडजवळ आयोजित करण्यात आले आहे.

“एक पाऊल तुमचं, कुणाचं तरी जीवन वाचू शकतं” या मानवतावादी संदेशातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून गरजू रुग्णांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज असणाऱ्या महिला तसेच विविध आजारांमुळे रक्ताची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व मोठे आहे.

दादीप्रकाशमणीजी यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करताना मानवतेची सेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे. “रक्तदान करा, जीवनदान द्या. मानवतेची हीच सेवा, हाच खरा धर्म” असा संदेश देत नागरिकांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

दत्तवाड व परिसरातील युवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, व्यापारी, नागरिक आणि रक्तदाते यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गरजूंसाठी रक्तदान करावे, असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने