महाराजस्व अभियानात २१ हजार ७५४ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ
शिरोळ । शिवार न्यूज नेटवर्क :
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने पोहोचवणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून, प्रशासनाने नागरिकांच्या दारी सेवा पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम केले आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. शिरोळ येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' कार्यक्रमात ते बोलत होते.
या अभियानाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील २१ हजार ७५४ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ, दाखले व आवश्यक कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. विविध विभागांच्या समन्वयातून एकाच छताखाली नागरिकांना शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे व शासकीय लाभांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, सामान्य नागरिकांना एखाद्या दाखल्यासाठी किंवा शासकीय योजनेच्या लाभासाठी अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी राज्य शासनाने महाराजस्व अभियान सुरू केले आहे. प्रशासनातील सर्व विभाग एकत्र येऊन नागरिकांना एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध करून देत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
ते पुढे म्हणाले की, शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेले दाखले आणि विविध योजनांचे लाभ तत्काळ मिळावेत, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शिरोळ तालुक्यात एकाच दिवशी २१ हजार ७५४ लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविणे ही प्रशासनाची मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी आहे. यामुळे शासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान महसूल विभागासह विविध शासकीय विभागांनी माहिती व सेवा केंद्रांचे स्टॉल उभारले होते. या माध्यमातून उत्पन्नाचे दाखले, सातबारा उतारे, विविध प्रमाणपत्रे, सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज, शासकीय योजनांची माहिती तसेच इतर आवश्यक कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. नागरिकांना विविध योजनांविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून अभियानाच्या उद्दिष्टांची माहिती दिली. हे अभियान यशस्वी करण्यासाठी महसूल विभागासह सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करत विशेष परिश्रम घेतल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी प्रशासनाचे कौतुक केले.
यावेळी माजी आमदार उत्हास पाटील, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्ठे यांची मनोगते झाली.
यावेळी शिरोळच्या नगराध्यक्ष योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, कुरुंदवाड चे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती मनीषा कदम, गटविकास अधिकारी विजय परीट, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, प्राचीता कोळी, उत्तरादेवी शिंदे, नंदिनी कांबळे, पंचायत समिती सदस्य फैजलेअली पटेल, सीमा म्हैशाळे, दिपाली होगले, ज्योती कांबळे, राजश्री माणकापुरे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
