हैदरअली मुजावर । शिवार न्यूज नेटवर्क :
ग्रामपंचायत शिरढोण येथे झालेल्या गावसभेत गावात दारूबंदी करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयानंतरही गावात चोरीछुप्या नव्हे तर खुलेआम दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गावातील विविध भागांत दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे.
याबाबत शिरढोणचे सरपंच सागर भंडारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गावातील बेकायदेशीर दारूविक्रीबाबत यापूर्वीच त्यांनी उत्पादन शुल्क विभाग, इचलकरंजी तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर केले आहे. मात्र त्यानंतर केवळ किरकोळ कारवाई करण्यात आली असून, बेकायदेशीर दारूविक्रीवर प्रभावीपणे आळा घालण्यात आलेला नाही, असे त्यांनी मत व्यक्त केले.
गावसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर झाल्यानंतरही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराकडे उत्पादन शुल्क विभागाने तातडीने लक्ष देऊन गावातील बेकायदेशीर दारूविक्रीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
"गावसभेचा निर्णय कागदावरच राहणार की प्रत्यक्षातही दारूबंदीची अंमलबजावणी होणार?" असा सवाल आता शिरढोणकर नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, गावातील बेकायदेशीर दारूविक्री कायमची बंद होणार तरी कधी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
