दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, शिरोळ ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन इमारत, कुरुंदवाड येथे महिला रुग्णालय उभारण्याचा निर्णय
मुंबई । शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, शिरोळ ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन प्रशस्त इमारत, कुरुंदवाड येथे स्वतंत्र महिला रुग्णालयाची स्थापना तसेच तालुक्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य उपकेंद्रांच्या उभारणीसाठी आवश्यक प्रस्तावांना गती देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत शिरोळ तालुक्यातील विविध प्रलंबित आरोग्यविषयक प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला.
बैठकीत बोलताना मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आरोग्य पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. दत्तवाड येथील सध्या सुरू असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्याच इमारतीवर आणखी ५० खाटांची वाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या विस्तारामुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक व अधिक व्यापक आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय संभाजीपूर आणि टाकळीवाडी येथे नवीन आरोग्य उपकेंद्रे सुरू करण्याच्या प्रस्तावांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच यड्राव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, तर लाटवाडी, शिवनाकवाडी, तेरवाड, मौजे आगर, कनवाड, खिद्रापूर, बस्तवाड, तमदलगे आणि जैनापूर येथे नवीन आरोग्य उपकेंद्रे मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
नृसिंहवाडी उपकेंद्राच्या जागी औरवाड येथे तसेच कवठेगुलंद उपकेंद्राच्या जागी गौरवाड येथे उपकेंद्र स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
मंत्री आबिटकर म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शिरोळ तालुक्यातील सर्व प्रलंबित आरोग्यविषयक प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देऊन आवश्यक निधी व प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही.
बैठकीनंतर आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले की, शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात तसेच तालुक्याची वाढती लोकसंख्या, पूरस्थिती आणि आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन विविध प्रस्ताव सातत्याने शासनाकडे मांडले होते. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, शिरोळ ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत, कुरुंदवाड येथे महिला रुग्णालय आणि नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंद्रामुळे शिरोळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळेल. ग्रामीण नागरिकांना उपचारासाठी दूरच्या शहरात जाण्याची गरज कमी होईल आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले
