Top News

खुरपे, दगड व काठीने मारहाण; राजापुरात परस्परविरोधी गुन्हे दाखल



कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे शेजाऱ्यांमधील जुन्या शेतबांधाच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून, पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे.

पहिल्या फिर्यादीनुसार, महादेवी महादेव ढवळे (वय ५२) यांनी शेजारी सिद्धप्पा आप्पय्या मडिवाळ व कल्पना सिद्धप्पा मडिवाळ यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तारेच्या कंपाऊंडजवळ लावलेल्या जास्वंदीच्या झाडांवरून झालेल्या वादातून कल्पना मडिवाळ यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण व धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सिद्धप्पा मडिवाळ यांनी खुरप्याने वार करून राजू ढवळे व संजय ढवळे यांना जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूने कल्पना सिद्धप्पा मडिवाळ (वय ४२) यांनी महादेवी ढवळे, राजू ढवळे आणि संजय ढवळे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, घरासमोर लावलेल्या जास्वंदीच्या झाडांवरून झालेल्या वादात आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पती सिद्धप्पा मडिवाळ यांना दगडाने मारून जखमी केले, तर स्वतःला खाली पाडून चप्पलने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गुन्ह्यांची नोंद पोलीस नाईक पवार यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोसले करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने