Top News

कळंब्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; थ्री स्टार लॉजवर छापा, सात जणांविरुद्ध गुन्हा

Ai फोटो


कोल्हापूर । शिवार न्यूज नेटवर्क :

बेकायदेशीर गर्भलिंग निदानाविरोधात करवीर पोलिसांनी मोठी कारवाई करत कळंबा येथील थ्री स्टार लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह एजंट आणि लॉज मालक अशा सात जणांविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघा महिला एजंटना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीही मिळविण्यात आली आहे.

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्यानंतर करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी विशेष मोहीम सुरू केली होती.

दरम्यान, २६ जुलै २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे कळंबा येथील थ्री स्टार लॉजवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी मुख्य आरोपी स्वप्निल केरबा पाटील हा गर्भलिंग तपासणी करून वाहनातून बाहेर पडताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने वाहनातून एका महिलेला उतरवून भरधाव वेगाने पळ काढला.

त्यानंतर संबंधित महिलेची चौकशी केली असता, मनिषा दिनकर कांबळे (रा. सावर्डे पाटण, ता. राधानगरी) हिने तिला गर्भलिंग तपासणीसाठी तेथे आणल्याचे सांगितले. तिच्यासोबत आणखी दोन महिलांचीही गर्भलिंग तपासणी झाल्याची माहिती समोर आली. त्या महिलांना अश्विनी गजानन शिंदे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) हिने आणल्याचेही निष्पन्न झाले. या दोन्ही महिला एजंटना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आणखी दोन एजंट किरण चव्हाण आणि संतोष कोळी, तसेच बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी लॉज उपलब्ध करून देणारा थ्री स्टार लॉजचा मालक यांचाही सहभाग समोर आला. अशा प्रकारे या प्रकरणात एकूण सात आरोपी निष्पन्न झाले आहेत.

याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम तसेच पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने केली. फरार मुख्य आरोपीसह इतर संशयितांचा शोध सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने