Top News

जयसिंगपूरमध्ये आठवड्यातील तिसरी घरफोडी; बंद घर फोडून साडेचार लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

 


जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क : 

जयसिंगपूर शहरात घरफोडीच्या घटना वाढत असून, गेल्या आठवडाभरातील ही तिसरी घरफोडी ठरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ताज्या घटनेत आंबेडकर सोसायटी परिसरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने ४ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

याबाबत सौ. सारा सचिन असुलेकर (वय ५२, व्यवसाय – नर्स, रा. प्लॉट क्र. ६९, आंबेडकर सोसायटी, जयसिंगपूर) यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी दुपारी ३ ते २७ जुलै रोजी मध्यरात्री १२.१० या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या बाहेरील जाळीच्या दरवाजावरील कुलूप व कडी उचकटून मुख्य दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर आतील खोलीतील लोखंडी कपाटाचे दार उघडून कपाटातील तिजोरी उचकटली आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व पेंडंट (₹१.१० लाख), १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस (₹१.५० लाख), १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हातातील कडा (₹१.१० लाख), तीन सोन्याच्या अंगठ्या (₹६० हजार) तसेच दोन जोड सोन्याचे कानातले (₹३० हजार) असा एकूण ₹४ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल आहे.

या प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर यांनी गुन्ह्याची नोंद केली असून, महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत या पुढील तपास करीत आहेत.

जयसिंगपूर शहरात आठवडाभरात सलग तिसरी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

थोडे नवीन जरा जुने