Top News

२५ लाखांची मागणी.. विवाहितेचा छळ, पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :

आयव्हीएफ (IVF) चाचणी करून घेण्यास भाग पाडणे, वडिलांची शेती स्वतःच्या नावावर करून घेण्यास सांगणे तसेच बंगळुरू येथे फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून २५ लाख रुपये आणण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सौ. नम्रता मयुरेश कुलकर्णी (वय ३०, व्यवसाय – आयटी इंजिनिअर, मूळ रा. डी-१०१, रोहन लेहर-२, बिटवाईज टॉवर्सजवळ, बाणेर, पुणे; सध्या रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरेश संदीप कुलकर्णी (पती), प्रियांका संदीप कुलकर्णी (सासू) आणि संदीप मधुकर कुलकर्णी (सासरे), सर्व रा. बाणेर, पुणे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, २५ मार्च २०२५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपींनी फिर्यादीला वारंवार आयव्हीएफ चाचणी करून घेण्यास सांगितले. तसेच तिच्या वडिलांची शेती तिच्या नावावर करून घेण्यास भाग पाडले आणि बंगळुरू येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणण्याची मागणी केली. या मागण्या पूर्ण न केल्याने शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच "तुला परस्पर संमतीने घटस्फोट देणार नाही," अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक पवार यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कोळी करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने