Top News

ॲसिड हल्ला प्रकरणी अब्दुललाट येथील आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी

कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :

 अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे २०२२ मध्ये घडलेल्या ॲसिड हल्ला प्रकरणातील आरोपी दादासो रामचंद्र जोशीलकर याला जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार दंडाची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यांवर कठोर संदेश गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, २७ जानेवारी २०२२ रोजी अब्दुललाट येथे आरोपी दादासो जोशीलकर आणि पीडित महिला यांच्यात सोन्याच्या व्यवहारातून वाद झाला होता. या रागातून आरोपीने पीडितेच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून तिला गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सेशन केस क्रमांक १९/२०२२ ची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एम. दळवी यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यु. एम. कुलकर्णी यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

या खटल्यात पीडितेसह एकूण ९ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेषतः वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत पाटील यांचा वैद्यकीय पुरावा आणि तपासी अधिकारी अमित पाटील यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सादर करण्यात आलेला साक्षीपुरावा, कागदोपत्री पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहिता कलम ३२६(अ) अंतर्गत दोषी ठरविले.

न्यायालयाने आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरी, ५० हजार दंड, तसेच दंड न भरल्यास नियमानुसार अतिरिक्त शिक्षा सुनावली.

या प्रकरणात कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. न्यायालयीन कामकाजादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल संदीप दिनकर हेगडे यांनी साक्षीदार उपस्थित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या निकालामुळे महिलांवरील ॲसिड हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश गेला असून, अशा प्रवृत्तींवर निश्चितच वचक बसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

थोडे नवीन जरा जुने