अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :
शमनेवाडी येथील प्रतिष्ठित जयकुमार खोत कुटुंबीयांचे शिक्षण, आरोग्य, संस्कार आणि सहकार क्षेत्रातील सामाजिक योगदान उल्लेखनीय असून समाजहिताच्या कार्यातून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार आमदार शशिकला जोल्ले यांनी काढले. त्या बोरगाव येथे खोत कुटुंबीयांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'वितराग' पेट्रोल पंपाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. चिंचणी मठाचे प.पू. श्री शिवप्रसाद देवरु यांच्या दिव्य सानिध्यात तसेच माजी खासदार ,डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या शुभहस्ते पेट्रोल पंपाचे उद्घाटन करण्यात आले.
*आमदार जोल्ले पुढे म्हणाल्या की, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयकुमार खोत यांची निवड त्यांच्या समाजाभिमुख कार्याची चोख पावती आहे. शिक्षण, आरोग्य, सहकार आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पिढी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून त्यांच्या उद्योग व्यवसायाला आमच्या शुभेच्छा कायम राहतील.
यावेळी प.पू. श्री शिवप्रसाद देवरु म्हणाले की, पेट्रोल पंप हा केवळ इंधन विक्रीचा व्यवसाय नसून रोजगारनिर्मिती, विकास आणि समाजसेवेचा महत्त्वाचा दुवा आहे. स्थानिक नागरिकांना दर्जेदार सेवा मिळण्या बरोबरच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कोणताही उद्योग प्रामाणिकपणा, गुणवत्ता, ग्राहकसेवा आणि विश्वास या चार तत्त्वांवर उभा राहतो. खोत कुटुंबीयांनी ही मूल्ये जपत समाजसेवेची परंपरा अधिक बळकट करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास हालशुगरचे अध्यक्ष जयकुमार खोत, संचालक रामगोंडा पाटील, नगरसेवक शरद जंगटे, जिल्हा परिषद माजी सदस्य सुदर्शन खोत, सुरेखा घाळे, युवा नेते जितेश खोत, अभिषेक खोत, विकी खोत, बाबण्णा खोत, प्रकाश पाटील, पिरगौडा पाटील, अशोक पाटील, डॉ. महावीर घाळे, दीपक खोत, सचिन खोत, बाहुबली शिरगुप्पे, जितेंद्र भोजे, बी.के. महाजन, अजित तेरदाळे, संजय महाजन, शंकर गुरव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व खोत कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
