Top News

बोरगावातून प्रथमच पंढरपूरकडे पायी दिंडी; १५ जुलैला भक्तिमय सोहळ्याला प्रारंभ

बारा दिवसांच्या आषाढी वारीचा संपूर्ण खर्च नगरसेवक शरद जंगटे यांच्याकडून; हजारो वारकऱ्यांचा सहभाग अपेक्षित

अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :

बोरगावच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासात प्रथमच आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे भव्य पायी दिंडी रवाना होणार असून, या ऐतिहासिक उपक्रमाचा पुढाकार नगरसेवक शरद जंगटे यांनी घेतला आहे. १५ जुलै २०२६ रोजी बोरगावातून या दिंडीचे उत्साहात प्रयाण होणार असून, पंचक्रोशीतील हजारो वारकरी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

या बारा दिवसांच्या पायी वारीचा संपूर्ण खर्च नगरसेवक शरद जंगटे हे स्वखर्चातून करणार आहेत. वारकऱ्यांसाठी दोन वेळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, आवश्यक औषधे तसेच साहित्य वाहून नेण्यासाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या दिंडीत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, पंचक्रोशीतील सर्व वारकरी, विठ्ठलभक्त आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शरद जंगटे यांनी केले आहे.

१५ जुलै रोजी दिंडीचा शुभारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीच्या स्वरूपात दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. मार्गावरील विविध देवस्थानांना वंदन करत हा सोहळा पुढे सरकणार आहे. यानिमित्ताने नागरिकांनी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढून, फुलांची सजावट करून तसेच महिला, युवक मंडळे व ग्रामस्थांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बोरगावसारख्या मोठ्या गावातून प्रथमच नियोजनबद्ध पद्धतीने पंढरपूरकडे पायी दिंडी रवाना करण्याचा संकल्प प्रत्यक्षात साकार होत आहे. या दिंडीचे नियोजन शरद जंगटे फाउंडेशन तसेच गोविंद पाटील, अजित पाखरे, अजित हिरेमणी, शैलेश केसरकर, जगन्नाथ कुंभार, बी. के. महाजन, सचिन कोळी, संजय महाजन यांच्यासह अनेक स्वयंसेवक करत असून, प्रत्येक वारकऱ्याच्या सुरक्षिततेसह सर्व सोयी-सुविधांची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

राजकीय, सहकार, शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले नगरसेवक शरद जंगटे यांनी आता अध्यात्मिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण पुढाकार घेतल्याने त्यांच्या या उपक्रमाचे बोरगाव, पंचक्रोशी तसेच जिल्हाभरातून कौतुक होत आहे. बोरगावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, असा हा भक्तिमय उपक्रम ठरणार असल्याची भावना वारकरी व्यक्त करत आहेत.

थोडे नवीन जरा जुने