Top News

बोरगावसह सीमाभागातील गुटखा व्यावसायिकांचे धाबे दणाणले

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या सूचनेनंतर राज्यात कडक गुटखाबंदीची शक्यता : सीमावर्ती भागात खळबळ



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

       कर्नाटकात गुटखाबंदी अधिक कडकपणे राबविण्याबाबत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी प्रशासनाला निर्देश दिल्याची चर्चा सुरू असून, त्यानंतर बोरगावसह सीमाभागातील गुटखा व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी झाल्यास सीमावर्ती भागातून सुरू असलेल्या अवैध गुटखा व्यापाराला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

      महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू असतानाही सीमाभागातील काही भागांतून अवैधरित्या गुटख्याची तस्करी होत असल्याचे आरोप वेळोवेळी समोर आले आहेत. बोरगाव, कारदगा, मांगूर, कोगनोळी आदी सीमावर्ती भागांतून महाराष्ट्रात गुटख्याचा पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याबाबत संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

  राज्य सरकारने कडक गुटखाबंदीची अंमलबजावणी केल्यास अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. दुसरीकडे, व्यसनमुक्तीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

         सीमाभागात गुटखा विक्री व तस्करी रोखण्यासाठी पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि अन्य संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. कडक गुटखाबंदीमुळे युवकांमधील व्यसनाधीनतेवर आळा बसेल आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा सीमावासीय व्यक्त करत आहेत.

थोडे नवीन जरा जुने