Top News

बसच्या खिडकीतून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढणे जीवावर बेतले ; लॉरीची धडक लागून आयटीआय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

सरकारी बसमधून प्रवास करताना थुंकण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढलेल्या आयटीआयच्या विद्यार्थ्याला मागून येणाऱ्या लॉरीची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ येथे घडली.

मृत विद्यार्थ्याची ओळख फक्किरेश चन्नय्या मुत्तळीमठ (वय १७, रा. शिरूर) अशी झाली असून तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मेश्वर डेपोची (क्र. KA-26 F-1039) केएसआरटीसी बस प्रवाशांना घेऊन जात होती. त्याचवेळी KA-04 AD-7218 क्रमांकाची मालवाहू लॉरी बसला ओव्हरटेक करत होती.

याच वेळी फक्किरेश याने थुंकण्यासाठी बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढले. दुर्दैवाने त्याच क्षणी ओव्हरटेक करणाऱ्या लॉरीची त्याच्या डोक्याला जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कुंदगोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणाची नोंद कुंदगोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अल्पवयात झालेल्या फक्किरेशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शिरूरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

थोडे नवीन जरा जुने