अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :
बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील नंदगाव येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (२८ जून) पहाटे घडली. या प्रकरणी अथणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदगाव येथील श्री अवजीकर मठ परिसरात राहणाऱ्या शोभा पिरगोंडा सारवाड (वय ३५) यांची त्यांचे पती पिरगोंडा संगप्पा सारवाड यांनी हत्या केली. आरोपी गेल्या चार वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
रविवारी पहाटे सुमारे पाचच्या सुमारास शोभा या घरात झोपलेल्या असताना आरोपीने कुऱ्हाडीने त्यांच्या गळ्यावर व शरीरावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत महिलेचे बंधू महंतेश गुरप्पा पाटील यांनी अथणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला तात्काळ अटक केली आहे.
या घटनेचा पुढील तपास अथणी पोलीस करीत असून कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे नंदगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
