आलास । शिवार न्यूज नेटवर्क :
आलास मतदारसंघातील विद्यार्थी, नोकरदार व सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी कुरुंदवाड ते कागवाड या बसमार्गावरील सर्व एसटी बसेस औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद माळ, कवठेगुलंद गाव, शेडशाळ गाव, शेडशाळ माळ आणि गणेशवाडी मार्गे कागवाडपर्यंत सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी कुरुंदवाड आगाराचे आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर करून या मार्गावरील प्रवाशांच्या अडचणींकडे लक्ष वेधले. सध्या या गावांतील विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, नोकरीसाठी ये-जा करणारे कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना थेट बससेवा उपलब्ध नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांना अन्य वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या सर्व गावांना जोडणारी नियमित बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल, प्रवाशांची गैरसोय दूर होईल तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल, असा विश्वास शहापुरे यांनी व्यक्त केला.
कुरुंदवाड आगार प्रशासनाने प्रवाशांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर या मार्गाने सर्व बसेस सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. त्यामुळे परिसरातील हजारो विद्यार्थी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
